स्वामी मकरंदनाथ
स्वामी मकरंद नाथांचा (श्री मकरंद माधव वझे ) जन्म २२ मे १९५७ रोजी झाला. लहान वयातच त्यांच्या मनावर भगवद्गीता, रामरक्षा, बोधकथा , राष्ट्रपुरुषांच्या कथा इत्यादी गोष्टींचा खोल ठसा उमटला. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची रामकृष्ण परमहंस , स्वामी विवेकानंद , योगी अरविंद अशासारख्या थोर तत्वज्ञानी महापुरुषांच्या जीवनावरील ओजस्वी व्याख्याने अंतःकरणाचा ठाव घेत होती. शालेय जीवनापासूनच त्यांना आत्मज्ञानाविषयी तळमळ होती, साधनेची ओढ लागली होती. सद्गुरु भेटीची तळमळ वाढत होती.
परम भाग्याने जुलै १९७६ मध्ये मकरंदनाथ स्वामी माधवनाथाकडे आले . अश्या महापुरुषाच्या सहवासात स्वामी मकरंद नाथांमध्ये असलेल्या सद्गुणांचा सुयोग्य पद्धतीने विकास होऊ लागला. १९७७ मध्ये स्वामी माधवनाथानी त्यांना अनुग्रहित केले. शुद्ध परमार्थाच्या ओढीमुळे थोड्याच काळात ते स्वामीजींचे अंतरंग शिष्य बनले. त्यांची आध्यात्मिक विचार ग्रहण करण्याची कला व त्यांच्यातील नेतृत्व गुण स्वामीजींनी हेरले व त्यांना युवा केंद्र सुरु करण्याची प्रेरणा दिली . याच युवा केंद्राचे रुपांतर पुढे ‘स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळा ’ त झाले. पुढे स्वामी माधवनाथांकडे येणाऱ्या पुण्याच्या कात्रज, धनकवडी भागातील अध्यात्मप्रेमी साधकांनी एक मंडळ स्थापन केले. स्वामीजींनी मकरंदनाथावर हि जबाबदारीही सोपविली. त्याचे नामकरण ' श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ' असे करण्यात आले.
स्वामी माधवनाथांच्या ठिकाणी असलेल्या अविचल निष्ठेने दिवसेंदिवस मकरंद नाथांची साधनेतील दृढता वाढत गेली. मकरंद नाथानी गीता , ज्ञानेश्वरी , दासबोध , तुकाराम गाथा , उपनिषद इ . चा सखोल अभ्यास केला . त्याला स्वामीजींच्या प्रवचनांच्या श्रवणाची जोड दिली. नाम व ध्यान साधने मध्ये ते डूब देऊन राहत व त्यात अनेकदा त्यांना उच्च पारमार्थिक अनुभव आले. स्वामी माधवनाथ हे सर्व पाहून सुखावून जात असत. १९८४ साली स्वामी मकरंद नाथांनी आपल्या राहत्या घरी स्वान्तः सुखाय ज्ञानेश्वरी निरुपणास सुरुवात केली. सद्गुरूंचा कृपाप्रसाद , आत्मप्रचीती , सद्ग्रंथांचे सखोल चिंतन, रसाळ व जोशपूर्ण वाणी यामुळे साधकांची संख्या वाढू लागली.
२९ सप्टेंबर १९९२ रोजी स्वामी माधवनाथानी नाथ संप्रदायाची जबाबदारी आपला शिष्योत्तम मकरंद नाथांकडे सोपविली. सद्गुरूंच्या इच्छेनुसार सद्गुरु देहाने असेपर्यंत मकरंद नाथानी आपले सांप्रदायिक नाव व अधिकार अप्रगट ठेवले व आपली साधना, अभ्यास, मनन, चिंतन अधिक तीव्र केली. १९९६ च्या गुरुपोर्णिमेला स्वामी माधवनाथानी देह ठेवला. शुद्ध परमार्थ प्रचार व प्रसाराचे कार्य , मंडळाची जबाबदारी व संप्रदायाची जबाबदारी मकरंद नाथावर आली.
सध्यस्थितीत स्वामी मकरंदनाथ नाथ संप्रदायाची धुरा समर्थपणे पेलत आहेत आणि अनेक साधकांना अनुग्रहित करून परमार्थाच्या वाटेवर मार्गदर्शन करीत आहेत. एका सत्पुरुषाच्या पश्चात त्याचे कार्य त्याच शुद्धतेने आणि निष्ठेने पुढे नेणे व वृद्धिंगत करणे हि सामान्य गोष्ट नाही. स्वामी मकरंद नाथ यासाठी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवत आहेत.